Wednesday, 18 March 2026

गणपती

आपल्याकडे कुणीही एखादे चांगले काम सुरू केले की आपण कामाचा श्रीगणेशा झाला असं म्हणतो, शुभकार्यात गणपतीला विशेष मान आहे, माझ्यासारख्या पोटासाठी जगणाऱ्या लोकांसाठी गणपतीचे मोदक हे त्याच्यावर प्रेम करण्यासाठी मिळालेले अजून एक कारण! 😊

या मालिकेची सुरुवात देखील आपण श्रीगणेशाने करणार आहोत. मंदिरांवर मोठ्या प्रमाणात कोरल्या गेलेल्या देवांपैकी हा एक देव आहे. समृद्धी आणि ज्ञान यांचे लक्षण असलेली ही देवता ओळखण्यासाठी सोपी आहे. कुठलाही देव किंवा शिल्पं ओळखण्यासाठी काही प्रमाणे आहेत,
१. हातामध्ये असलेली आयुधे
२. शरीराची ठेवण, रचना
३. वाहन
४. मुकुट, केश आणि इतर दागिने
गणपतीच्या हातामध्ये खालील आयुधे प्रामुख्याने दिसतात - अक्षमाला, पाश, दंड, मोदकपात्र, भग्न - दंत, अंकुश आणि परशू. गणपतीला प्रामुख्याने ४ हात दाखवलेले असतात पण अनेक ठिकाणी २ किंवा ८ हातांचा गणेश देखील बघायला मिळतो. पायाशी त्याचे वाहन - मूषक (उंदीर) देखील कोरलेला असतो. 

शिल्पाचे वर्णन किंवा निरीक्षण करताना ते क्लॉकवाइज केल्यास मूर्ती समजणे सोपे जाते. या फोटो मधल्या गणपतीचे निरीक्षण करूयात. पाय दुमडून बसलेला गणपती, लेखणी सारखा पकडलेला भग्न दंत, हात तुटलेला, पद्म, मोदकपात्र, पायात उंदीर (उंदराचे कान दिसतात). अंगात सर्प यज्ञोपवित परिधान केले आहे. 
कपाळावर असलेल्या आठ्या, वर गेलेल्या भुवया आणि बारीक झालेले डोळे हे एकाग्रता दर्शवतात, का बरं एवढं एकाग्र होऊन बसावे लागले असेल गणपतीला? 
व्यासांनी महाभारत लिहिण्याचा घाट घातला आणि गणपतीला लेखनिक होण्याची विनंती केली, देवच तो.. रागावला. म्हणाला ठीक आहे, पण एका अटीवर, मी एकदा लिहायला सुरू केले की थांबणार नाही. समोर व्यास होते, म्हणाले अट मान्य, पण माझी पण एक अट आहे. प्रत्येक श्लोक समजून घेऊन मगच लिहायचा. लिखाण सुरू झालं, मध्येच व्यास एखादा कुट श्लोक (कोडं) सांगायचे आणि ते सोडवायला गणपतीला बराच वेळ लागायचा आणि त्या वेळात ते पुढचे श्लोक रचायचे, ना गणपती थांबले ना व्यास... आणि महाभारत तयार झालं. हे शिल्प त्या कलाकाराने तो महाभारत लिहिणारा गणपती डोळ्यासमोर ठेऊन कोरले असावे. 
या कथा कायम काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतात. काही मिळतंय का बघा! 

शिल्पाचे ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे

वराह अवतार

विष्णूच्या वराह अवताराची वर्णने शतपथ ब्राह्मण, तैतरीय अरण्यक, रामायण, भागवत पुराण, विष्णू पुराण, इत्यादी अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आलेली आहेत. हिरण्याक्ष नावाच्या असुराने पृथ्वी ही सागरात बुडवली आणि विष्णूने वराह अवतार घेऊन पृथ्वीला वाचवले, अशा अर्थाची छान कथा या अवताराबरोबर जोडली गेलेली आहे. पण वराह हा कायमच भूमीची रक्षा करणारा अशा अर्थाने महत्व प्राप्त केलेला दिसतो. पृथ्वीला वाचवले म्हणजेच पाचव्या, पृथ्वी तत्वाच्या निर्माणासाठी तो कारणीभूत ठरला असा देखील एक वेगळा दृष्टिकोन यामागे आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या कांतारा नावाच्या चित्रपटात देखील गावाच्या आणि जंगलाच्या रक्षणासाठी गावकरी वराह रूपाचीच प्रार्थना करतात. एवढेच नाही तर या अवताराची कथा जशी दक्षिणेत प्रसिद्ध आहे तशीच अगदी काश्मीर मध्ये देखील तेवढीच महत्त्वाची आहे. काश्मिरच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या मीर नावाच्या जलाशयातले पाणी याच वराह अवताराने पर्वताचा एक भाग फोडून रिकामे केले आणि तिथल्या असुरांचा संहार ऋषींनी केला. ती जागा जिथे वराह अवताराने प्रहार केला आणि पर्वत फोडला त्या जागेचे नाव आहे वराहमूल ज्याला आज आपण बारामुल्ला म्हणून ओळखतो. 

या वराह अवताराचे तीन प्रमुख प्रकार शिल्प परंपरेत दिसतात. 

१. भुवराह - आदिवराह किंवा नृवराह 

२. यज्ञवराह

३. प्रलयवराह 

यांचा थोडक्यात परिचय इथे करून घेऊयात. 

१. भुवराह - आदिवराह किंवा नृवराह - या शिल्पात वराह हा चतुरहस्त असून दोन हातात शंख आणि चक्र पकडलेले असतात. बरोबर पृथ्वी असून तिचे हात अंजली मुद्रेत असतात. वराह हा आदिशेषावर उभा राहिलेला दिसतो. असे वर्णन वैखानसआगमात आलेले आहे. 

शिल्परत्न नावाच्या ग्रंथात देखील या शिल्पाचे वर्णन येते. हातामध्ये वराह अवताराने गदा आणि पद्म पकडलेले असून. वरच्या प्रमाणेच त्याचा एक पाय आदिशेषावर दाखवलेला आहे पण दुसरा पाय मात्र कुर्मावर (कासव) ठेवलेला दिसतो. हातामध्ये भूदेवी असून तिने वराहाचे सुळे पकडलेले दिसतात. दुसरा हात त्याने आपल्या कमरेवर ठेवलेला दिसतो. खांदे आणि एकूणच शरीर अतिशय बलदंड दाखवलेले असते जे त्याच्या पराक्रमाची गाथा सांगेल. याच्या पूजेने संसारातील संपन्नता देखील प्राप्त होते असे देखील या ग्रंथांमध्ये म्हटलेले आहे. 

मध्य प्रदेश मध्ये उदयगिरी लेणीमध्ये कोरलेला प्रचंड वराह आणि कर्नाटकात हळशी गावातल्या मंदिरात असणारा वराह ही दोन अतिशय सुंदर शिल्पं या अवताराची आहेत. 


२. यज्ञवराह 

चार पायांचा पूर्ण प्राणी रूपातला वराह इथे दाखवलेला असतो. याच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या देवता कोरलेल्या असतात. ज्या अधिष्ठानावर तो उभा आहे त्याच्या मधोमध, सरपटत पुढे जाणारा शेष दाखवलेला असतो. वराह्याच्या समोर भूदेवी उभी असलेली दाखवतात तर चारही पायांच्या बाजूने शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे दाखवलेली दिसतात. खजुराहो, पुण्याजवळ लोणी भापकर, धुळ्याचे राजवाडे संशोधन केंद्र या ठिकाणचे यज्ञवराह अतिशय सुंदर कोरलेले आहेत. 


३. प्रलय वराह - या मूर्तीला असे नाव का मिळाले याबद्दल अजून विस्तृत माहिती शोधणे सुरू आहे. पण ही अतिशय वेगळी अशी मूर्ती असते. वराह हा सिंहासनावर बसलेला असून एक पाय पादपिठावर ठेवलेला दिसतो. मागच्या दोन हातात शंख आणि चक्र असून पुढचा एक हात अभय मुद्रेत असतो तर दुसरा मांडीवर ठेवलेला दाखवतात. शेजारी हातामध्ये उत्पल फुल घेतलेली भूदेवी दाखवलेली असते. 

या व्यतिरिक्त देखील विविध वर्णनाच्या वराह मूर्ती आपल्याला दिसतात पण साधारण मांडणी आणि कथा वारीलप्रमाणेच कोरण्याचा प्रयत्न असतो. पण एकंदरीतच कुठल्याही प्रकारामध्ये सर्व कलाकारांनी वराह अवताराचा पराक्रम अतिशय ताकदीने आणि भक्तीने कोरलेला आहे. 

धन्यवाद. 

Indraneel Sadanand Bankapure

Photo credits - Tushar Kodolikar, Varad Gadre, Indraneel Bankapure